मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावीत सत्ताधा-यांना धक्का दिला आहे. सत्ताधारी आमदारांच्या मतदार संघात महाविकास आघाडी आघाडीवर असल्याने महायुतीच्या आमदारांची धाकधूक वाढली आहे. अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे त्यामुळे लोकसभेच्या निकालाप्रमाणेच विधानसभेचा निकाल लागल्यास महाराष्ट्रात सत्तांतर अटळ आहे अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस १३, ठाकरेंच्या शिवसेनेला १०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ८ तर भाजप ९, शिंदे सेनेला ७, राष्ट्रवादी अजित पवार १ अशा जागा मिळवल्या आहेत. मागील वेळेस २३ जागा पटकावणा-या भाजपला अवघ्या ९ जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे १४ जागांवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडून राज्यात सत्ता मिळवली. गेल्या दोन वर्षापासून शिंदे फडणवीस आणि पवार सरकार सत्तेत आहे. मात्र पक्षफोडीचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सहन करावा लागला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४१ जागांवर विजय मिळाला होता. यातील २३ भाजपाच्या तर १८ शिवसेनेच्या होत्या. त्याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसला ४ आणि कॉंग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं २५ जागा लढवून फक्त एकाच जागेवर विजय मिळवला होता.
अवघ्या तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत. मात्र लोकसभेच्या निकालात भाजपच्या ४२ आमदारांच्या मतदार संघामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. शिवसेना शिंदेचे ४० आमदार आहेत त्यातील १४ आमदारांच्या मतदार संघात मविआ आघाडीवर आहे. शिंदेंच्या २६ जागा धोक्यात आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ४० आमदारांपैकी २५ आमदारांच्या मतदार संघात महाविकास आघाडीने मुसंडी मारल्याने या जागांवर धोका आहे. त्यामुळे भाजपसह शिंदे आणि अजित पवार यांना मोठा धक्का समजला जात आहे.
शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे दोन तुकडे झाल्याने उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह नवीन असतानाही लोकसभा निवडणूक चांगलं यश मिळवलं. फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेला पटले नसल्यानेच त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्यामुळेच त्यांना यश मिळाल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे १५ आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हा आकडा दुप्पट होऊन ३० आमदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. काँग्रेसचे ४५ आमदार आहेत विधानसभा निवडणुकीत २७ आमदार वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांचा आकडा ७२ वर जाण्याची शक्यता आहे तर शरद पवारांकडे सध्या १२ आमदार आहेत त्यांचे ४० आमदार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे १५० च्या अधिक आमदार निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आणखी काय काय घडामोडी घडतात याकडे लक्ष वेधले आहे.
*****