मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देताच सरचिटणीस पदाचा राजीनामा देणारे किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधलं आहे. राज ठाकरेंच्या इंजिनाची साथ सोडतं, शिंदेंनी हाती मशाल घेतली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला गुढीपाडवा सभेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंचे शिलेदार आणि मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाला राम-राम केला. यानंतर किर्तीकुमार शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. किर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुकवर पोस्टही शेअर केली आहे.
किर्तीकुमार शिंदे यांची फेसबुक पोस्ट
शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे, अनेक वर्षांपूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषयही आवर्जून मला सांगितला.
मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल, याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आज देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश- सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकूमशाही मनोवृत्तीच्या भाजप-मोदी-शाह यांच्यासमोर अक्षरशः लोटांगण घालत असताना सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपविरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे. सर्व समाजघटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शि व से ना ही चार अक्षरांची अत्यंत बळकट ‘जादुई’ संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकूमशाह ‘भामोशा’ विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धवजी घेत असलेले अतुलनीय, कठोर परिश्रम यांमुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याच बरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.