ठाणे : ठाणे कल्याण लोकसभेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  डॉ श्रीकांत शिंदे यांना  कल्याण लोकसभेचा महायुतीचा उमेदवार घोषित केले. त्यामुळे एक प्रकारे ठाण्यावर आपला दावा भक्कम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात भाजपच्या जिल्हा विभागीय मुख्यालयाचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे त्यामुळे कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपकडून ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे मतदार संघात कोण गुढी उभारणार, अशीच चर्चा सुरू आहे.

ठाणे शहरातील पोखरण रोड क्रमांक एक येथे असलेल्या या कार्यालयाच्या सभोवतीचा परिसर आजपासूनच भाजपच्या झेंड्यांनी वेढला आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकलेला असताना आणि त्यासंबंधीचा तिढा सुटलेला नसताना भाजप उद्या ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाण्याचे ‘ठाणेदार’ आपणच असल्याचे अप्रत्यक्षरित्या दिसून येत आहे.

कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याने, आता ठाणे लोकसभा मतदारसंघ हिसकाविण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. पडद्यामागे त्यासंबंधीची रणनीती आखण्यात येत आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून ठाण्यात भाजपचा अप्रत्यक्षरीत्या दावा असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!