बीजिंग – चीनमध्ये लोकसंख्या कमी झाल्याने चीन सरकारने विविध प्रयत्न सुरु केले असून लोकसंख्या वाढीसाठी चीनमध्ये धोरणे राबवून तीन अपत्यांकरिता सबसिडी दिली जात आहे. लोकसंख्येत गेल्या तीन-चार वर्षांत लक्षणीय घट झाल्यामुळे चीनची लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावरून घसरण होऊन,पूर्वी द्वितीय क्रमांकावर असलेला भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश झाला आहे.
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार आदल्या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये देशाची लोकसंख्या २.०८ दशलक्षने कमी झाली.१९८० पासून देशाने ‘एक मूल’धोरण राबवल्यामुळे नवीन जन्मदरात लक्षणीय घट नोंदवली गेली. त्यानंतर कोविडमुळे देशाच्या मृत्युदरात झपाट्याने वाढ होऊन चीनची एकंदर लोकसंख्या झपाट्याने कमी झाली.परिणामी २०२१ पासून चीनला लोकसंख्या वाढीसाठी धोरणे,तीन अपत्यांसाठी सबसिडी यांसारखे उपाय योजावे लागत आहेत.