कोल्हापूर : आदमापूर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामामांचे मंदिर २० मार्चपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांचा वार्षिक भंडारा उत्सव ३० मार्च ते ७ एप्रिल २०२४ कालावधीत होणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर, शिखर व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावर्षी श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा देवालय येथे पारंपरिक पद्धतीने यात्रा भरणार आहे. या यात्रेची तयारी आणि नियोजन सुरु आहे. त्यामुळे २० मार्चपर्यंत दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंदिराच्या प्रशासकीय समिती सदस्य रागीणी खडके व ग्रामस्थांनी केले आहे. ३० मार्च सायंकाळी ७ वाजता विनापूजन, आरती व दररोज पहाटे ४ ते ५ समाधीपूजन, ५ ते ६ काकडा आरती दुपारी ४ ते ५.३० हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, सायंकाळी ७ वाजता आरती ९ ते ११ कीर्तन रात्री ११ ते पहाटे ४ हरी जागर अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दररोज प्रवचन, कीर्तन आणि भजन होणार आहे. ६ एप्रिलला पहाटे कृष्णात डोणे यांची भाकणूक, तर रविवार ७ एप्रिलला सकाळी पालखी सोहळा होणार आहे.