सेऊल : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिकन दक्षिण कोरियाच्या दौर्यावर असताना उत्तर कोरियाने आज आपल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडील किनाऱ्यापासून समुद्रात ३०० किलोमीटर अंतरावर ही क्षेपणास्त्रे एकामागोमाग एक चाचणीसाठी डागण्यात आली.
दक्षिण कोरिया व अमेरिकेमधील सहकार्याच्या भूमिकेनंतर ही चाचणी घेण्यात आली असल्याचे मत आंतरराष्ट्रीय राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. उत्तर कोरियाने आज अनेक मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी समुद्रात घेतली. अमेरिकेचे लक्ष वेधण्यासाठी किंवा एक प्रकारे धमकी देण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
ब्लिंकन यांनी आज सकाळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक येओल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लोकशाही संदर्भातील एका परिसंवादात सहभाग घेतला. यावेळी ते दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेऊन अणवस्त्रसज्ज उत्तर कोरियाच्या सततच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये काही सहकार्य करार होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यामध्ये संयुक्त लष्करी कवायती झाल्या होत्या. या कवायती भविष्यातील अशांततेला आमंत्रण देणाऱ्या असल्याचे सांगत उत्तर कोरियाने त्याचा निषेध केला होता.
दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आज सकाळी क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली .ही क्षेपणास्त्रे समुद्रात ३०० किलोमीटर अंतरावर पडली.