मुरूड जंजिरा : मुरूड तालुक्यातील राजपुरी समुद्रतातील मासेमारी पश्चिमेकडून जोरदार वारे सुटत असल्याने ठप्प झाली आहे.त्यामुळे या परिसरातील सुमारे 80 नौका 15 दिवसांपासून किनाऱ्यावर नांगरण्यात आल्याची माहिती राजपुरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी दिली.
या सिझनमध्ये राजपुरी खाडीत सफेद जवळा, कोळंबी, पापलेट अशी मासळी मोठ्या प्रमाणात जाळ्यात येत असते. मासळी मिळेल या अपेक्षेने काही नौका समुद्रात मच्छीमारीसाठी जात आहेत; परंतु समुद्रात जोरदारपणे वाहत असलेल्या वाऱ्यामुळे मासेमारी जाळी फाटतात किंवा वाहून जातात.मासळीदेखील खोल पाण्यात गेल्याने मिळत नाही. त्यामुळे मच्छीमारांचा डिझेल खर्च देखील सुटत नाही. सफेद कोळीम थोड्या प्रमाणात मिळते.
एकेकाळी राजपुरी येथून बोंबील, सोलट कोलंबी, चैती कोलंबी, पापलेट, शेवंड, सुरमई, रावस आदी मासळी मुरुडच्या मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात येत असे.परंतु गेल्या तीन चार वर्षांपासून राजपुरीच्या समुद्रात मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण कमालीचे घटले असून छोटी जवळा (सफेद कोळीम) मासळीदेखील दुरापास्त झालेली आहे.त्या मुळे मच्छीमार आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेले दिसून येत आहेत. ओला सफेद कोळीम मिळत नसल्याने कोळी महिलांनादेखील सुकवून विक्रीसाठी आधारदेखील राहिलेला दिसत नाही. मुरुड परिसरातील जेष्ट मंडळी सांगतात की, १५ ते २० वर्षांपूर्वी सर्व प्रकारची अगदी ताजी मासळी राजपुरी बंदरातून मिळत होती. दिवसागणिक मासेमारी हळूहळू ठप्प होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *