अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील
श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातील धक्कादायक घटना

अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात सोमवारी मध्यरात्री चोरीचे घटना समोर आली आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यानी श्री सुद्रिकेश्वर महाराजांचे ४० किलो वजनाचे चांदीचे सिंहासन चोरून नेले आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV) कैद झाला आहे. या सिंहासनाची किंमत जवळपास ३० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोमवारी सकाळी ग्रामसभा घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्याशिवाय दिवसभर गाव बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी घटनास्थळी भेट दिली क्षणपथकाने प्रार्थमिक शाळेच्या भिंतीपर्यंत माग काढला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी मध्यरात्री १२:३०वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे मंदिरासमोर आले. त्यांनी आपल्या जवळील कटावणीने मंदिराचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश करून सिंहासनाची चोरी केली.
सोमवारी पहाटे श्रीगोंदा येथील अमित बगाडे हे सव्वा पाच वाजता मंदिरात आले. त्यावेळी त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. दरम्यान मंदिराचे पुजारी रमेश धुमाळ मंदिरात आले. चोरीचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले आणि ग्रामस्थ मंदिराजवळ जमा झाले. चोरट्यांनी आता मंदिर देखील टार्गेट करायला सुरुवात केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थांनी जवळपास सात कोटी रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावाची सुद्रिकेश्वर महाराजांवर प्रचंड श्रद्धा आहे, सिंहासन चोरीला गेल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला. ५० वर्षांपूर्वी सुद्रिकेश्वर महाराज मंदिराचा कळस देखील चोरीला गेला होता. त्यानंतर चोरीची ही दुसरी घटना आहे. संबंधित चोरट्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!