डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यासह शिपायाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील सदनिकांना कर आकारणी करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजारांची रक्कम स्वीकारताना या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश माधवराव महाले (40) हा शिपाई असून तो सद्या केडीएमसीच्या ह प्रभागातील कर आकारणी विभागात कार्यरत आहे. तर सूर्यभान नानाजी कर्डक (60) हा सेवानिवृत्त कामगार असून तो ह प्रभागातून सेवानिवृत्त झाला आहे.
या संदर्भात 42 वर्षीय तक्रारदार गृहस्थ पश्चिम डोंबिवलीत राहतात. एका इमारतीतील 36 सदनिकांना कर आकारणी करण्यासाठी केडीएमसीच्या ह प्रभागातील कर आकारणी विभागात अर्ज केला होता. या विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सूर्यभान कर्डक आणि शिपाई योगेश महाले या दोघांनी कर आकारणी करण्यासाठी प्रत्येक सदनिकेमागे ३ हजार रूपये प्रमाणे ३६ सदनिकांचे मिळून १ लाख ८ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार गृहस्थाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शहानिशा केली असता त्यात तथ्य आढळून आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक विलास मते यांच्या नेतृत्वाखाली ह प्रभागात सापळा रचला. यावेळी सदर रकमेपैकी ५० हजारांची लाच स्वीकारताना सेवानिवृत्त कर्मचारी सूर्यभान कर्डक आणि शिपाई योगेश महाले या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ थेट अथवा 022-20813598/20813591 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे यांनी केले आहे.