मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केल्याचे परिपत्रक आरोग्य विभागाने जारी केले. दिल्लीच्या आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे टास्क फोर्स काम करेल, अशी माहिती मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

राज्यात जे. एन-१ या नव्या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. दिवसागणिक वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, सरकार अलर्टमोडवर आले असून कोविड -१९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या निर्णयान्वये टास्क फोर्स स्थापन केले होते. त्याच धर्तीवर टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आली आहे. दिल्ली आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे फोर्स काम करेल. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम या टास्क फोर्सचे सदस्य असणार आहेत. तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असतील. या संदर्भातील शासन निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे.

टास्क फोर्स हे काम करणार

गंभीर आणि अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड- १९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *