साहेब, का थांबलात तुम्ही, कोणाची वाट बघताय..?

एक कल्याण डोंबिवलीकर नात्याने, मनसे पदाधिका-याचे उध्दव ठाकरेंना पत्र

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपली सत्ता येउन बरोबर दोन वर्ष पूर्ण झाली, महापौर तुमचा, आमदार तुमचा, खासदार तुमचा व मंत्री सुध्दा तुमचेच….मग आम्हाला प्रश्न पडतो, साहेब, का थांबलात तुम्ही, कोणाची वाट बघताय..? दोन वर्ष झाले की सत्तेची, दोन वर्षात एक म्हणावे असं चांगलं विकास काम पूर्ण नाही, तुमच्या पदाधिका-यांनी सगळ्या सोयी सुविधांचा बट्ट्याबोळ करून ठेवलाय, करदाते नागरीक अक्षरश: जीव मुठीत घेउन जगतायत, बरं बोलायचं तर कोणाला बोलायचं…? बिचारे मतदान करून बसले ना..? म्हणुन ठरवलं, तुम्हालाच पत्र लिहुन कळवावे की कुठ घोडं अडलंय कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे..? एक कल्याण डोंबिवलीकर या नात्याने मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना यांनाच पत्र लिहून सवाल केलेत.

पालिकेत तर तुमची सत्ता आहेच पण राज्यात पण तुम्ही व केंद्रात पण तुम्ही सत्तेत, सत्तेचे भागीदार.. आमच्या सुसंस्कृत शहरांचा विकास..? कदाचीत राज्याच्या राजकारणातून वेळ नसेल किंवा स्थानिकांनी नेहमी प्रमाणे सबकुछ आलबेल चे खोटे चित्र तुमच्या समोर रंगवले असेल, म्हणून तर थांबला नाहीत ना..? असा सवालही कदम यांनी पत्रात केलाय. नाशिकला मनसे ला फक्त ५ वर्षच सत्ता मिळाली, पण निधीची अडचणीचे कारण न देता राज ठाकरे साहेब सरकारवर अवलंबून राहिले नाही, नाशिक शहर सुंदर देखणे करण्यासाठी त्यांनी “सीएसआर” फंड मिळवून आणला व विकास कामे मार्गि लावली, तुमचे पालक मंत्री वा इतर पदाधिकारी असं का करत नाही…? किंवा आपण स्वत: त्यांना असा फंड मिळवून देण्यास मदत वा सहकार्य का करत नाही..? आपण राज्याचे सत्ताधारी, मनात आणलेत तर अश्या शेकडो कंपन्या/उद्योजक उभे रहातील मदत करायला…मग पुन्हा प्रश्न, साहेब, का थांबलात…?

सगळया समस्या सहज सुटण्यासारख्या आहेत, कारण तेथील नगरसेवक आपले, औद्योगिक विकास खात्याचे मंत्री आपले, रस्ते विकास व सा.बांधकाम खाते मंत्री आपले, पर्यावरण, प्रदुषण नियंत्रण खाते मंत्री आपले, पालक मंत्री आपले, एक खासदार, एक आमदार आपले, बरं महापालिकेची तिजोरी म्हणजेच स्थायी समिती सभापती देखील आपले…मग सांगा साहेब येवढे हाताशी बळ असताना, सत्ता असताना आम्हाला प्रश्न तर पडणार ना.., अडलंय कुठे..? का विकास थांबलाय..? का सुटत नाहीत प्रश्न..? अशा प्रश्नांची सरबत्ती कदम यांनी उध्दव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात केलीय.

पत्रात नेमक्या कोणत्या समस्या मांडल्यात ..

१. आधारवाडी कचरा डेपो कधी बंद होणार..?
२. शीळ रोड व दुर्गाडी येथील रोजची वेळकाढू वाहतूक कोंडीतून मुक्तता कधी मिळणार
३. एमआयडीसी रहिवाशी विभागातील खड्डेमय रस्ते ज्यांचा दुरूस्ती खर्च अगदी नगन्य आहे ते रस्ते दुरूस्त कधी होणार..?
४. डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार का…?
५. रहाटळे तलाव सुशोभीकरण व काळा तलाव (भगवा तलाव) सुशोभिकरण भाग-२ सुरू होणार का..?
६. कलेची नगरी म्हणून मान मिळवतो पण अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या समस्येतुन कलाकारांची आणि कलारसीकांची सुटका होणार का…?
७. जिथे सर्व स्थरावरील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले तेथे खेळाडूंसाठी ना सुविधा ना क्रिडा धोरण, सुरक्षे अभावी गर्दुल्यांचे अड्डे ठरलेली मैदाने सुरक्षीत करून क्रिडा धोरण ठरणार का..?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *