कल्याण ,: कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एका घराला आज रात्री ९ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच इमारतीमधील नागरीकांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. आगीत दहाव्या मजल्यावरील घर जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने जिवित हानी झालेली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेऊन तातडीने आग विझविण्याचे काम केले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात कल्याण अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील ज्या घराला आग लागली त्या घरातील रहिवासी हे दिवाळीनिमित्त घराबाहेर होते. त्यामुळे सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र दिवाळीचा फटाके घरातील गॅलरीवर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. त्याची ठिणगी उडून ती दहाव्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतील पडद्यावर पडली असावी. त्यातून ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळतात कल्याण अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी घेऊन शर्तीचे प्रयत्न सुरू केले.आग इतरत्र पसरु नये यासाठी अग्नीशमन दलाने तातडीने बंबाद्वारे पाण्याचा फवारा सुरु केला. तसेच इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. इमारतीतील प्रत्येक रहिवासी एकमेकांना तुम्ही सुखरुप आहात ना अशी विचारपूस करीत होता. अग्नीशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर दोन्ही बाजूने पाण्याचा जोरदार फवारा मारुन आग आटोक्या आणली. त्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *