डोंबिवली : कल्याण लोकलमध्ये विसरलेली एका नोकरदार महिलेची पिशवी रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे रविवारी परत मिळाली. या पिशवीत लॅपटाॅप, विदेशी चलन असे एकूण तीन लाख २९ हजाराचा ऐवज होता. कल्याणमधील योगीधाम भागातील नोकरदार महिलेची ही पिशवी होती.


कल्याण पश्चिमेतील योगीधाम भागात राहत असलेली पुर्णिमा मेनोन ही महिला मुंबईत नोकरी करते. त्यासाठी ती लोकलने प्रवास करते. शनिवारी सायंकाळी ही महिला मुंबईतून कल्याण लोकलने कल्याण रेल्वे स्थानकात रात्री ९ वाजता आली. पूर्णिमा या घाई गडबडीत उतरून घरी गेल्या. त्यानंतर त्यांना आपली कार्यालयात नेलेली पिशवी लोकलमध्ये विसरल्याची बाब लक्षात आली. त्यांनी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी येथील नियंत्रण कक्षाला संपर्क केला. घडला प्रकार सांगितला. नियंत्रण कक्षातून ही माहिती कल्याण रेल्वे स्थानकातील सुरक्षा बलाला देण्यात आली.  मोटरमनने कल्याण रेल्वे स्थानकातून लोकल ठाकुर्ली यार्डमध्ये नेली होती.

ठाकुर्ली यार्डातील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान जल सिंह यांना कल्याण रेल्वे स्थानकातून यार्डात आलेल्या कल्याण लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात एका महिला प्रवाशाची कार्यालयीन पिशवी विसरल्याची माहिती देण्यात आली. सिंह यांनी त्या डब्यात जाऊन पिशवी ताब्यात घेऊन डोंबिवली रेल्वे सुरक्षा बळाच्या ताब्यात दिली. बँगेची तपासणी करण्यात आली. त्यात एक लॅपटाॅप, १०० अमेरिकन डाॅलरच्या ३० नोटा असे एकूण तीन लाख २९ हजार रुपयांचे सामान पिशवीत आढळून आले. रविवारी साहाय्यक उपनिरीक्षक राज कुमार यांच्या उपस्थित पुर्णिमा यांची कार्यालयीन पिशवी त्यांच्या ताब्यात देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *