मुंबई : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला जाणार असल्याचा मोठा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते. त्यामुळे ते पुण्यातील चांदणी चौक उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. शिंदे यांच्या आजारावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाण्यात मृत्यूचं तांडव असताना मुख्यमंत्री मात्र विश्रांती घेत आहेत, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळच विधान केलं आहे.
दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्याचं कारण देत शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्ली हायकमांडचा प्रयत्न सुरू आहे, अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही खेळी असावी असा कयास वडेट्टीवार यांनी लगावला आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची खेळी निष्प्रभ करण्यासाठी अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी केली जाऊ शकते, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.