नांदेड : केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेड येथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानांतर्गत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांना चार सवाल करीत, हिंमत असेल तर आपली भूमिका स्पष्ट करा असे आव्हान देत राज्यातील महाविकास आघाडीवर जारेदार टीका केली. यावेळी शहा यांनी २०२४ च्या निवडणुकीतील काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर केला. 

अमित शहा म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, हे उद्धव ठाकरे यांनी स्वत: मान्य केलं होतं, मात्र निकाल लागल्यानंतर एनडीए जिंकली. तेव्हा त्यांनी दिलेलं वचन मोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेले. दगा देण्याचं, धोका देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.  

उध्दव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करा  …

अमित शाह यांनी उध्दव ठाकरेंना चार सवाल करीत जनतेसमोर त्याची उत्तरे द्यावीत असे आव्हान दिले. शहा म्हणाले, ‘मुस्लिम आरक्षण हे संविधानाला धरुन नाही. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम आरक्षण जायला पाहिजे की नाही ? हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं. ‘कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार इतिहासाच्या पुस्तकातून वीर सावरकरांचे धडे काढून टाकत आहे. याला तुमचं समर्थन आहे का ?  कलम ३७० हटवलं हे योग्य केलं का नाही ? राम मंदिर उभारणी करता ते योग्य करता की नाही ? या सगळ्यांची उत्तरं उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर द्यावीत आणि आपली भूमिका स्पष्ट करावी  असे आव्हान अमित शहांनी ठाकरेंना दिले. 

 काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवारही केला जाहीर !

शहा म्हणाले की, आता २०२४ ची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की, या देशाचा पंतप्रधान कोण व्हावं ? मोदींनी व्हावं की राहुल गांधींनी व्हावं?” अशा शब्दांत शहांनी काँग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार राहुल गांधी असतील हे एकप्रकारे जाहीरच करुन टाकलं. काँग्रेसने पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही मात्र शहा यांनी नांदेडच्या सभेत जाहीर करीत,   याबाबत त्यांनी नांदेडच्या जनतेनं कोणाला निवडून देणार याबाबत विचारणा देखील केली.

मोदींचा जगभर करिष्मा 

गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारच्या काळात देशात विकास झाल्याचे सांगत काँग्रेसच्या कारभार टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ते परदेशात गेले तर कुणी ऑटोग्राफ मागतंय, कुणी पाय धरतंय तर कुणी बॉस म्हणतंय. मोदींचा करिष्मा जगभर पसरला आहे असेही शहा यांनी सांगितले. 

———–  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!