मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या सत्तासंघर्षाची सुनावणी झाली होती. घटनापीठातील पाच न्यायमूर्तीमधील न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे ११- १२ मे ला निकालाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देशातील भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी मार्गदर्शक असाच हा निकाल ठरणार असल्याने या निकालाकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष वेधले आहे. निकालावर राज्यातील सत्ताधाऱ्यांचे भवितव्य ठरणार असल्याने, राज्य सरकारची धाकधूक वाढली आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख सर्वोच्च न्यायालयाने अद्याप जाहीर केलेली नाही. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल. त्यामुळे हा निकाल कर्नाटकच्या मतदानानंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच घटनापीठातील पाच न्यायमूर्तीमधील न्या. एम. आर. शहा १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. १३ आणि १४ मे शनिवार रविवार आहे. त्यामुळे ११, १२ मे रोजी निकालाची अपेक्षा कायदेतज्ञाकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या काही दिवसांतच येण्याची शक्यता आहे असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ५ दिवसांच्या लंडन दौऱ्यावर जात आहेत. ९ मे ते १५ मेपर्यंत विधानसभा अध्यक्षांचा लंडन दौरा आहे.. ९ मे रोजी रात्री लंडनला निघणार, तर १५ मे रोजी परत येणार आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागेल अशी स्थिती असतांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या लंडन दौऱ्याच्या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावरच खुलासा करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर
अपात्रतेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असल्याने माझ्या लंडन दौऱ्याचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही नसल्याचा नार्वेकर यांनी खुलासा केला आहे. तर काही याचिका विधिमंडळ कार्यालयात दाखल असल्याने त्याची प्रक्रिया देखील सुरू होईल. मात्र, न्यायालयाच्या निकालावर सर्व बाबी अवलंबून असतील अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली आहे.