स्मार्ट गर्ल करण्यासाठी सर्वांनी स्मार्ट होणे आवश्यक : गिरीश बापट

पुणे : मुलींना स्मार्ट करण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी स्मार्ट होण्याची आवश्यकता असून यामुळे समाजाचा विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
अल्पबचत भवन येथे पुणे जिल्हा परिषद, भारतीय जैन संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉंग’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे व तंबाखूमुक्त शाळा अभियानाची घोषणा व उद्घाटन समारंभादरम्यान ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल शिरोळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा व सलाम मुंबई फाऊंडेशनच्या राजेश्री कदम उपस्थित होत्या.
बापट म्हणाले की, शिक्षण घेणाऱ्या मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले संस्कार हे मुलांमध्ये चांगला स्वभाव व वागणूक रुजवतात. यामुळे राज्य व देशाच्या बळकटीकरणात भर पडते. मुलींना स्मार्ट बनविण्यासाठी सर्व प्रथम समाजातील सर्व लोकांना स्मार्ट बनणे आवश्यक आहे. म्हणून पहिली सुरुवात स्वत: पासून करा. कुटुंब व्यवस्था कोलमडू देवू नका, ती टिकवा. विज्ञानाच्या चांगल्या गोष्टींचा उपयोग करा व दुरुपयोग टाळा. स्मार्ट गर्ल टू बी हॅपी, टू बी स्ट्रॉंग या अभियानाद्वारे इयत्ता 8 वी, 9वी, 10वी, 11वी व 12वीतील मुलींना सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास तयार करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील विद्यार्थिनींना सक्षम करण्यात मदत होणार आहे. तंबाखूमुक्त शाळा अभियानातंर्गत व्यसन टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!