राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत ठाणे संघाची बाजी
ठाणे : ९ व्या राज्यस्तरीय १९ वर्षाखालील चॉकबॉल स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत बाजी मारली आहे.
3 ते ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत ठाणे मुलींच्या संघाने साखळी फेरीत, बाद फेरीत तसेच उपांत्य फेरीत सर्व संघांवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात कल्याण डोंबिवली मनपाच्या संघाचा ३२-१५ असा धुव्वा उडवत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले, तसेच मुलांच्या संघाने सुद्धा सर्व सामन्यात एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, अंतिम फेरीत अमरावती जिल्ह्याने कडवे आव्हान देत ठाणे संघाचा पराभव करत प्रथम क्रमांकावर नाव कोरले व ठाणे मुलांचा संघ द्वितीय स्थानावर राहिला. या संपूर्ण स्पर्धेत मुलींच्या संघातून मंजू जाधव, वंदना दुवा, साक्षी, भक्ती यांनी तर मुलांच्या संघातून खेळताना कर्णधार रुपेश गावडे, अनिकेत या खेळाडूंनी अप्रतिम खेळाचे दर्शन घडवत ठाणे जिल्ह्याला प्रथम व द्वितीय क्रमांकावर आणले. या स्पर्धेत ‘स्टार ऑफ महाराष्ट्र’चा किताब मंजू जाधवला तर मुलांच्या संघातून अमरावती जिल्ह्याच्या अजिंक्य यास मिळाला. या दोन्ही संघास प्रशिक्षक म्हणून अनिकेत जरे, सागर गवारे यांचे तसेच जिल्हा सचिव प्रा. राहुल अकुल यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेतून निवडलेला संघ येत्या १०ते १२ रोजी तिरुपती, आंध्रप्रदेश येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा सहसचिव प्रा. संदीप नरवाडे यांनी दिली.