ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे (प्रतिनिधी)- ओबीसी हा जात समूह कधीच एकत्र येत नाही. सुमारे ५४ टक्के लोकसंख्या असलेला हा वर्ग जर एकत्र आला तर या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतो. आरक्षणाचे विरोधक कोण, आणि समर्थक कोण याची जाणीव ठेवून ओबीसींनी राजकीय भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात केले. ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल येथे करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. आव्हाड बोलत होते.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी खा. आनंद परांजपे, माजी नगरसेवक संदीप लेले, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, कविता पाटील, नंदा पाटील, नम्रता कोळी, कमल चौधरी, प्रतिभा मढवी, दिपा गावंड, ॠता आव्हाड, प्रा. प्रकाश भांगरथ, भालचंद्र ठाकरे, राजाभाऊ चव्हाण, रमाकांत पाटील, रुपेश हाटे, दीपक धरी, जयंवत बैले, मंगेश आवळे, दत्ता चव्हाण, अमर आठवले, नितीन लांडगे, संदीप खांबे, रमेश आंब्रे, अनिता हिलाल, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सावित्रीमाई आणि जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली त्याचा सर्वाधिक फायदा विशिष्ठ जातीच्या महिलांनीच घेतला. पण, सावित्रीमाईंना याच वर्गाने विरोध केला होता, हे विसरता कामा नये. सत्यशोधक समाज फुलेंनी स्थापन केला. पण, या दाम्पत्याने जी बिजे रोवली त्याचे आज वटवृक्ष झाले आहेत. आता कोणीतरी म्हणाले की फुलेंनी भीक मागून शाळा सुरु केल्या. पण, त्यांना हे माहित नाही का, की टाटांपेक्षा फुलेंचे वार्षिक उत्पन्न अधिक होते. ते प्रचंड श्रीमंत होते. मागासवर्गीयांच्या आरक्षणाची भाषा सर्वात आधी कोणी केली असेल तर ती महात्मा फुलें यांनीच केली.
आपण एकत्र होतच नाही. आपणाला मनुवादाचा स्पर्श व्हायला लागला आहे. आपणही नको त्यांच्या मागे लागलो आहे. ज्यांनी सावित्रीमाई- जोतिबांना, बाबासाहेब, शाहू यांना सन्मान दिला नाही. ते आपल्याला काय सन्मान देणार ? म्हणून आरक्षण गरजेचे आहे. आरक्षणामुळेच आपला समाज पुढे जाईल. खाईत पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आधार आरक्षण आहे. पण, तेच आता काढून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. जर आरक्षण टिकवू शकलो नाही; तर, पुढचा काळ कठीण आहे. या काळापासून वाचण्यासाठी आपणाला संविधान वाचविण्याची शपथ घ्यावी लागेल. संविधान आहे म्हणून आपण आहोत, हे ध्यानात ठेवा, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.
‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान
पत्रकार रुपाली बिडवे, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक पटकावणारी वैशाली तांडेल, घाडगे दाम्पत्य, विक्रीकर सहआयुक्त तनुजा मस्करे, वनाधिकारी गिरीजा देसाई, सरकारी वकील रेखा हिवराळे यांचा ‘सावित्रीच्या लेकी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
ठाण्यात फुले स्मारक साकारणार- निरंजन डावखरे
आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, ठाणे शहरात फुले दाम्पत्याचे स्मारक उभे राहिले पाहिजे, यासाठी माझा आग्रह आहे. शासन-प्रशासनाच्या दरबारी त्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. निधीची तरतूद तर केली आहेच; लवकरच हे स्मारक उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले की, ठाणे शहरात स्मारक उभे करण्यासाठी आम्ही अनुकूल असून हे स्मारक लवकरच उभे राहिल, असा आशावाद व्यक्त करुन भिडेवाडा स्मारकाचा प्रश्नही लवकरच निकाली निघेल, असे आश्वासन दिले.