सीएम साहेब, आमचे घर वाचवा हो
कॅन्सरग्रस्त माजी सैनिकाची मुख्यमंत्रयांकडे विनंती
मुंबई प्रतिनिधी : बोरीवली येथे राहणारे माजी सैनिक होसेदार साहेर यांचे घर हडप करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅन्सरग्रस्त असलेले होसेदार हे ७ वर्षापासून लढा देत आहेत. मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यामुळे आता न्यायासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडं घातलं आहे. आम्ही सीमेवर लढतो परकीयांना कंठस्थान घालतो पण माजी सैनिकाला स्थानिक गुंडाकडूनच त्रास दिला जातोय. सीएम साहेब, आमचे घर वाचवा हो अशी कळकळीची विनंती माजी सैनिक होसेदार यांनी केली आहे.
बोरीवली येथील गणमुर्ती को ऑप हौ सो लि सेक्टर १ रूम नंबर १०९ डी/ ५ गोराई नंबर १ येथे साहेर हे १९९४ पासून कुटूंबासमवेत राहतात. त्यांच्या शेजारील डी/६ ही रूम सुधीर देसाई यांच्या मालकीची होती. त्यांनी ती रूम आनंत शेंगटे यांना विकली. सदर जागा ही निवासासाठी असतानाही शेंगटे यांनी सोसायटीचे नियम पायदळी तुडवून त्या ठिकाणी व्यावसायिक वापर करीत, ओम गोराई सहकारी पतसंस्था मर्यादीत ही पतपेढी सुरू केली आहे. त्यामुळे देसाई व शेंगटे यांनी संगनमत करून माझी रूम बळकावण्याचा डाव आखल्याचा आरोप साहेर यांनी केला आहे. मला व माझया कुटूंबाला सातत्याने धमकी देऊन मारहाण करीत मलाच घरातून हाकलून लावले आहे. तीन वर्षापूर्वी मुंबई महापालिकेकडून माझया घरावर कारवाई करून तोडण्यात आले. देसाई व शेंगटे यांच्या दादागिरीसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात अनेकवेळा तक्रार केली. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, उलट पोलीसात तक्रार केल्याने त्यांनी महिलांना पाठवून मलाच मारहाण केली व मी मला त्या घरात राहता येऊ नये. यासाठी घराचे छप्पर पूर्णपणे तोडण्यात आले. सध्या मी कुटूंबासमवेत ताडदेव येथे भाडयाच्या खोलीत राहात आहे. आपल्यावरील अन्यायाचा पाढा होसेदार यांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केला मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्रयाकडे निवेदन सादर केलं आहे. आम्ही सैनिक सीमेवर लढतो, परकीयांना कंठस्थान घालतो. आपल्या देशातील माणसं सुखी राहावी भयमुक्त राहावी यासाठी सैनिक जीवाची बाजी लावतो. पण माजी सैनिकालाच त्रास दिला जात आहे. सैनिक शहिद झाल्यानंतर सरकार बरेच काही देते पण जिवंत माजी सैनिकाला गुंडापासून त्रास होतो त्याला वाचवावे अशीही विनंती साहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
———
होसेदारांना सैन्यदलाकडून ६ पदके
फिरोजपूर बॉर्डर या १९७१ च्या यध्दात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. जम्मू काश्मिर येथील लडाखमध्येही त्यांचा सहभाग होता त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सैन्यदलाकडून त्यांना सहा पदके मिळाली आहेत. सध्या ते कॅन्सरग्रस्त आहेत मात्र आजारी अवस्थेत त्यांचा लढा सुरू आहे.
————