एसटी कर्मचाऱ्यांचे फक्त संपकाळातील वेतन कपात होणार

८ दिवसांची अर्जित रजा समर्पित केल्यास वेतन कपात नाही

मुंबई, : एसटी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल, किंवा जे कर्मचारी संपकाळातील ४ दिवसांसाठी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

मंत्री दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाचा कोणताही कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेला तर संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी एक दिवस विनाकाम – विना वेतन तसेच ८ दिवसांचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल, असा निर्णय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या दि. 29 जानेवारी 2005 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या संपकालावधीसाठी कर्मचाऱ्यांचे ३६ दिवसांचे वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी नुकत्याच झालेल्या संपाच्या बाबतीत या निर्णयास स्थगिती देण्याचा निर्णय मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत ३६ दिवसांचे वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.

*एसटी महामंडळ हे कर्मचाऱ्यांसोबत*

ते म्हणाले की, सर्वसामान्य एसटी कर्मचारी हे नेहमीच प्रवाशांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. एसटी महामंडळ हे अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. किंबहुना संपकाळात सुद्धा या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या मालमत्तेचे किंवा वाहनांचे कुठल्याही प्रकारे नुकसान न करता शांततेत संप केला. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी संपावर असताना देखील अनेक कर्मचाऱ्यांनी एसटी बसेसचे पूजन केले. या सर्व कर्मचाऱ्यांची एसटीवर प्रामाणिक निष्ठा आहे. एसटीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी ३६ दिवसांचे वेतन कपात करण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात येत आहे, असे मंत्री रावते यांनी सांगितले.

दर दिवसाचा पगार टप्प्याटप्प्याने चार महिन्यात कपात करण्यात येईल. तथापी, जे कर्मचारी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, असे मंत्री  .रावते यांनी सांगितले.

००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *