पावसामुळे रनवे बंद : विमानांची उड्डाणे रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सकाळच्या सत्रातली अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तसेच मुंबई विमानतळावरील मुख्य रनवे देखील अद्याप बंदच आहे.
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडतो आहे. यामुळे मुंबईची विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईवरून जाणाऱ्या 56 विमानांचे मार्ग बदलले आहेत. पावसामुळे मुंबईच्या विमानतळावर पाणी साचल्याने नागपूरहून आलेल्या तीन विमानांना माघारी पाठवण्यात आले आहे. पण यामुळे एअर इंडियाच्या विमानातील शेकडो प्रवाशी रात्री पासून नागपूरच्या विमानतळावर अडकले आहेत. नागपूरहुन रात्री ९ वाजून २० मिनिटांनी सुटलेल्या एअर इंडियाच्या विमानाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरण्यास मनाई करण्यात आली. ते ११ वाजून २० मिनिटांनी पुन्हा नागपूर विमानतळावर माघारी आले. पण एअर इंडियाच्या या विमानातील प्रवाशांना कुठलीही सोय विमानतळावरील प्रशासनाने आणि एअर इंडियाच्या वतीने मिळाली नाही. यातही जे लोक नागपूरचे होते ते लोक आपल्या घरी निघून गेले पण मुंबईच्या लोकांना विमानतळावरच ताटकळत बसावे लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!