मुंबई, दि .1 : राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रात कॉसिस कंपनी मार्फत गुंतवणूक केली जात आहे. शून्य उत्सर्जन व पर्यावरणपूरक वाहन निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी उद्योग विभाग व इंग्लंडच्या कॉसिस इ मोबिलीटी कंपनी यांच्यात २८२३ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि ‘कॉसिस’ ई मोबिलिटी कंपनीदरम्यान पुणेजवळ तळेगाव येथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अन्बलगन, कॉसिस ग्रुप चे संस्थापक आणि संचालक राम तुमुलुरी आदी उपस्थित होते. एमआयडीसीच्या वतीने पी अन्बलगन यांनी तर कॉसिसच्या वतीने संचालक रवीकुमार पंगा यांनी करारावर स्वाक्षरी केली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या ईव्ही धोरणाबाबत माहिती दिली. प्रदूषण कमी करणे ही आजची गरज असून बदलत्या तंत्रज्ञानानुसार महाराष्ट्र ई मोबिलिटीकडे वाटचाल करीत आहे. वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने अत्यावश्यक बाबींचा स्वीकार करण्याच्या राज्याच्या धोरणानुसार राज्यात गुंतवणूक करीत असल्याबद्दल त्यांनी कॉसिस कंपनीचे स्वागत केले.

इंग्लंडमध्ये प्रकल्प, महाराष्ट्रात कारखाना
कॉसिस मार्फत तळेगाव येथे 2823 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून या प्रकल्पातून 1250 रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच यामुळे वातावरण बदल नियंत्रण करण्यासही मदत होईल. कॉसिस समुहाद्वारे पहिल्या टप्प्यात ईव्ही बॅटरीचा पुरवठा करण्यासाठी इग्लंड येथे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात कारखाना उभारण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील विकसित इको सिस्टीमला चालना मिळेल व राज्यातील प्रमुख शहरातील सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रीक वाहनांचा वाटा २५ टक्के होण्यास मदत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!