सेवा सुविधा नाही तर कर नाही : कल्याणकरांचे आजपासून असहकार आंदोलन
कल्याण : महापालिकेचे सर्व कर भरून सुद्धा जनतेला महापालिकेकडून कोणत्याच सोयी सुविधा मिळत नाही. त्यामुळे सेवा सुविधा नाही तर कर सुद्धा नाही असा पवित्रा कल्याणातील जागरूक नागरिक संघाने घेतलाय. जागरूक नागरिक संघाचे श्रीनिवास घाणेकर यांनी महात्मा गांधीजींच्या असहकार तत्वावर आधारीत आंदोलन छेडण्यात येत असल्याचा इशारा केडीएमसी आयुक्त पी वेलारासु आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत याना बुुधवारी एका निवेदनाद्वारे दिलाय.
एकीकडे महापालिकेत भ्रष्ट आणि ढिसाळ कारभार सुरू आहे. तर दुसरीकडे महापालिकेकडून नागरिकांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत यासंदर्भात अनेकवेळा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. आयुक्तांची भेट घेण्यासाठी ठिय्या आंदोलन छेडावे लागले होते. त्यानंतर 5 ऑक्टोबरला आयुक्तांनी संघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली होती. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि महापालिका पुरवू शकत असणारी सेवा सुविधा याविषयी या बैठकीत चर्चा झाली त्यानंतर आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना आदेशही दिले मात्र अजूनही त्याची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे गांधीजींच्या तत्वानुसार असहकार आंदोलन करीत असल्याचे कल्याणातील जागरूक नागरिक घाणेकर यांनी सांगितले.