विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके तर  श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार  !

65 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 

नवी दिल्ली :  65 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार  राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते  गुरुवारी प्रदान करण्यात आले. विज्ञान भवन येथे केंद्रीय माहिती व प्रसारण विभागाच्या फिल्म समारोह संचालनालय याच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी,केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड,राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीचे अध्यक्ष शेखर कपूर व अन्य सदस्य मंचावर उपस्थित होते.

विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

यावर्षी मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी कविता खन्ना, तसेच पुत्र अभिनेते अक्षय खन्ना यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रूपये रोख, सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे. विनोद खन्ना यांनी  वर्ष 1970 ते 2015 पर्यंतअनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी सुरूवातीला नकारात्मक भूमिका केल्या.   नंतर त्यांना सकारात्मक भूमिकाही मिळाल्या. त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या सोबतही  काम केले. अमर अकबर अन्थोनी, मुकद्दर का सिकंदर,   दयावान,  अलीकडचा चित्रपट दबंग, दिलवाले  या चित्रपटात ही ते बघायला मिळाले होते. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना  यावर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट सृष्टीत बहुमोल योगदान देणाऱ्या 47 व्यक्तींना आतापर्यंत  दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणा-या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांचे पती बोनी कपूर,मुलगी जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी राष्ट्रपती यांच्या हस्ते स्वीकारला. पुरस्कारचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार  रूपये रोख असे आहे.

  ‘नगरकीर्तन’ या पंजाबी चित्रपटासाठी रिध्दी सेन या 19 वर्षीय अभिनेत्याला त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.  रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
धप्पा’ ला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मतेसाठी पुरस्कार. 

निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित आणि सुमतीलाल शाह निर्मित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटास राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार, राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि 10 लाख 50 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पावसाचा निबंध’ या नॉनफिचरला राष्ट्रीय पुरस्कार 

नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली  ‘पावसाचा निबंध’ या चित्रपटासाठी प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. याच चित्रपटाचे ऑडीओग्राफर अविनाश सोनवने यांना सर्वोत्कृष्ट ऑडीयोग्राफीचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रजत कमळ आणि ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

म्होरक्या’ : सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार

अमर देवकर दिग्दर्शित व कल्याण पाडाळ निर्मित‘म्होरक्या’ हा मराठी चित्रपट देशातील सर्वोत्तम बाल चित्रपटाचा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि १  लाख ५० हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  ‘म्होरक्या’ या चित्रपटासाठी यशराज क-हाडे आणि रमण देवकर या दोन बाल कलाकारांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

कच्चा लिंबू’ : सर्वोत्तम मराठी  चित्रपट

 मराठी भाषेसाठी  ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला  सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून मंदार देवस्थळी यांची निर्मिती आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
मयत’ : सर्वोत्कृष्ट लघुपटाला पुरस्कार 
सुयश शिंदे दिग्दर्शित व निर्मित ‘मयत’ हा सर्वोत्कृष्ट लघुपटाला आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटास रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे  पुरस्काराचे स्वरूप  आहे. नॉनफिचर चित्रपट श्रेणीत स्वप्नील कपुरे दिग्दर्शित ‘भर दुपारी’ या चित्रपटास विशेष उल्लेखनीय पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.  पुरस्कार स्वरूपात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

व्हीलेज रॉकस्टार्स’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘व्हीलेज रॉकस्टार्स’ हा आसमी भाषेतील चित्रपट देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला असून आज राष्ट्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.यावर्षी पुरस्कारार्थींना रोख मिळालेली रक्कम ऑनलाईन प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!