मुंबई ठाणे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा 

मुंबई : मुंबई ठाण्यात रेल्वेने  तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेतल्याने पहिल्याच दिवशी चाकरमण्यांचे मेगा हाल झाले. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शुक्रवारचा पहिला दिवस प्रवाशांच्या कसरतीचा ठरला. तसेच दुसरीकडे रस्त्यावरही प्रचंड वाहतुक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. मुंबई ते ठाणे दिशेने जाणा-या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली. 

 रेल्वे प्रशासनाकडून ठाणे ते सीएसटी दरम्यान तीन दिवसांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात फलाट क्रमांक १० आणि ११ तर ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरणाचे काम सुरूअसल्याने ६३ तासांचा जम्बो ब्लॉक सुरू आहे. यामुळे लोकलच्या एकूण ९३०  फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १६१ , शनिवारी ५३४, तर रविवारी २३५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.  गुरूवारी मध्यरात्री साडे बारापासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवार दुपारपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र यामुळे अनेक गाड्या, लोकल्स रद्द करण्यात य़ेणार असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेवर रोज सुमारे ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला.

मेगा ब्लॉकमुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या काही गाड्या रद्द झाल्याने लोकल गाड्या पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. डाऊन साईडची फास्ट ट्रॅक वरील लोकल सेवा पूर्णपणे बंद होती. स्लो ट्रॅक वर लोकल गाड्या उशिराने सुरु असल्याने मुंबई कडून कर्जत व कसाऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता. स्टेशनवर गर्दी आणि लोकलमध्येही गर्दीच. प्रवाशांनी गच्च भरलेली लोकल स्टेशनवर थांबायच्या आतच लोकांची आत शिरण्याची धडपड सुरू होती. त्यामुळे लोकलमधून चढणे आणि उतरणे प्रवाशांना मुश्किल झाले होते. अनेक प्रवाशी यामध्ये धडपडल्याचे प्रकार घडले. उपनगरातून मुंबईत येणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला तर संध्याकाळी कार्यालय सुटल्यानंतर देखील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी  होती. 

लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द

मध्य रेल्वेच्या या जम्बो मेगाब्लॉकमुळे फक्त लोकल सेवेवरच परिणाम झालेल नाही तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटर सिटी ट्रेनसह लांबपल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या. मुंबई- हावडा दुरांतो एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावणार असून सीएसएमटी ऐवजी दादर स्थानकातुन रात्री एक वाजता सुटणार आहे. अतिशय महत्वाचे काम असेल, फारच आवश्यकता असेल तरच मुंबईकरांनी प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले. 

वाहनांच्या लांबच लांब रांगा 

मुंबई ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुलुंड टोलनाका ते ऐरोली ब्रिज पर्यंत मोठी वाहतूक कोंडी आहे. एकीकडे मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने खाजगी वाहने घेऊन कर्मचारी कामावर घेऊन आले आहेत. त्यामुळे आज सकाळी आणि आता संध्याकाळी देखील वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. सकाळी देखील ऐरोली जवळ कंटेनरचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला होता.

बेस्टची अधिक सेवा 

 मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक असल्याने बेस्ट प्रशासनाने अधिक बसेस सोडल्या होत्या. त्यामुळे बेस्टमध्येही प्रवाशांची गर्दी उसळली होती.

मुंबई विद्यापीठाकडून सुट्टी  

मुंबई विद्यापीठातील संलग्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १ जून २०२४ रोजी मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या शनिवार सुट्टी दिल्याने महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सर्व कर्मचाऱ्यांना कामावर येणे अनिवार्य असेल. मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षावर परिणाम झाला नाही. आज विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या.परंतु आजच्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षेवर झाला नाही. सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.

दाेन परीक्षा पुढे ढकलल्या 

रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या २ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कामासाठी ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाणे गैरसोयीचे होणार आहे. यामुळे शनिवार दिनांक १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शनिवार दिनांक १ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ चा एक व बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ चा एक अशा दोन परीक्षा होत्या. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.

मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या

मुंबईतील मध्य रेल्वेच्या महा मेगाब्लॉकमुळे पुणे एसटी विभागाकडून मुंबईसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी ४० जादा बसेस सोडण्यात येतील . रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडेल हेच लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन करण्यात आलं आहे.  

 सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी

मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी  ६३ तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली. ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *