डोंबिवली : घर खरेदी-विक्रीचा बहाणा करून मुंबई, ठाण्यातील एकूण सात जणांनी मिळून ॲक्सिस बँकेच्या कल्याण शाखेतून ४ कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात घर खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता ती कर्जाऊ रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी एमएफसी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत हा कर्ज घेण्याचा आणि फसवणुकीचा प्रकार घडला आहे. ॲक्सिस बँक, कर्ज वितरण विभाग, ओल्ड सूचक निवास, मुरबाड रस्ता, कल्याण पश्चिम या बँँक व्यवस्थापनाची आरोपींनी फसवणूक केली आहे. आरोपींमध्ये सोमदीप सुकुमार घोष, माधुरी सुकुमार घोष, राजदीप सुकुमार घोष, सुकुमार कालीपदा घोष (रा. सिध्दांचल फेज सहा, पोखरण रस्ता, ठाणे), गौरव लवकुमार वधेरा (४९), प्रणव लवकुमार वधेरा, लवकुमार केदारनाथ वधेरा (८०, रा. सेंसेड सोसायटी, पाली हिल रस्ता, खार, मुंबई) यांचा समावेश आहे. ॲक्सिस बँँकेचे कल्याण शाखेचे व्यवस्थापक आनंद आगासकर (४३) यांनी या फसवणूक प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुुरुवारी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांंनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले, ठाणे येथील आरोपी घोष कुटुंबियांनी आम्ही मुंबईतील खार येथील वधेरा कुटुंबियांची सदनिका खरेदी करणार आहोत असे ॲक्सिस बँकेच्या कल्याण शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या घर खरेदीसाठी आम्हाला ६ कोटी ९० लाखाच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले. बँकेने कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण करून घोष कुटुंंबियांना ४ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने ४ कोटी ३० लाख रुपयांचा धनादेश घर विक्री करणारे गौरव वधेरा यांच्या नावाने काढला. हा धनादेश घोष कुटुंबियांनी वधेरा यांच्या साहाय्याने कुलाबा येथील बाॅम्बे मर्कंटाईल शाखेत वटविला.
घोष आणि वधेरा हे कट व कारस्थान रचून हे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करत आहेत हे बँक अधिकाऱ्यांच्या तात्काळ निदर्शनास आले नाही. खार येथील सेंंसेड इमारती मधील सदनिका विक्रीला आम्हाला सोसायटीने ना हरकत परवानगी दिली आहे, अशी बनावट कागदपत्रे घोष, वधेरा यांनी ॲक्सिस बँकेत दाखल केली. कर्ज वितरणानंतर आरोपी सोमदीप घोष आणि त्यांच्या कुटुंबियांनी बँकेचे हप्ते फेडण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेने कर्ज हप्ते फेडीसाठी नोटिसा पाठवूनही आरोपी त्यास दाद देत नव्हते. विविध कारणे आरोपी देत होते. पाच वर्ष उलटूनही कर्जदार कर्ज हप्ते फेडू शकले नाहीत. आरोपींनी संगनमत करून बँकेकडून ४ कोटी ६० लाखाचे कर्ज घेतले. ते स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरले. असे बँकेचे ठाम मत झाले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!