कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रातील २७ गावांमधील सफाई कामगारांनी आज केडीएमसीच्या मुख्यालयावर मोर्चा काढून आपला आक्रमक पवित्रा दाखवला. हे कामगार, महानगर सफाई कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली, शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करत आहेत. त्यांनी केडीएमसीच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हे काम बंद धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मनसे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी नगरसेवक महेश पाटील, महेश गायकवाड, कांग्रेस नेते संतोष केणे सह इतर नेते उपस्थित होते.

सफाई कामगारांचा आरोप आहे की, १ जून २०१५ रोजी महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांमधील कामगारांना अद्याप केडीएमसीच्या सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. तसेच, त्यांना किमान वेतनही दिले जात नाही. गेल्या नऊ वर्षांपासून कामगार संघटना या मागण्यांसाठी संघर्ष करत आहे, मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. आंदोलनादरम्यान, “कामगार एकजुटीचा विजय असो” आणि “२७ गावांमध्ये सर्व काही महानगर पालिका नियमानुसार, मग कर्मचाऱ्यांना काम करताना वेगळे नियम का?” अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी, जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर महापालिका अधिकाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही, तसेच महापालिकेच्या कार्यालयांना टाळे ठोकू असा इशारा दिला आहे. त्यांनी २७ गावांमधील कामगारांना केडीएमसीमध्ये कायमस्वरूपी समाविष्ट करण्याची, मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याची आणि सेवानिवृत्त कामगारांना पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी केली आहे.

या आंदोलनात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदारांसह इतर पक्षांचे इच्छुक उमेदवारही सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *