

कल्याण, ता. १७ (प्रतिनिधी)
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उमेदवारांना मिळणाऱ्या पाठिंब्याच्या आकडेवारीत मोठे बदल होत आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार सचिन दिलीप बासरे यांना ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायाकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघात या दोन्ही समुदायांचे सुमारे २० टक्के मतदार आहेत. हे मतदान निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांनी बासरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेणे, विकासकामांवर भर देणे आणि सर्वसमावेशक राजकारण ही बासरे यांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे या समुदायाचे प्रतिनिधी सांगतात.
“सर्वधर्मीयांसाठी समानता आणि एकात्मतेचा विचार करणारा उमेदवार हीच आमची निवड” असे अनेक मतदारांचे म्हणणे आहे. बासरे यांनी आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान प्रत्येक समाजाच्या प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे.
या पाठिंब्यामुळे बासरे यांचे प्रमुख विरोधक अस्वस्थ झाले आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांचा वाढता पाठिंबा निश्चितच या निवडणुकीत बासरे यांचे पारडे जड करेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
यावेळी कल्याण पश्चिम मतदारसंघात एक वेगळं राजकीय समीकरण तयार होताना दिसत आहे, आणि बासरे यांना मिळालेला वाढता पाठिंबा ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.
—–