मुंबई : मुंबईत आरडीएक्स उतरले असून बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचा पोलिसांना कॉल करून खळबळ उडवून देणाऱ्या ‘हॉक्स कॉलर’ला पालघर जिल्हयातील डहाणू येथून अटक करण्यात आली आहे. अश्विन महिशकर असे अटक करण्यात आलेल्या हॉक्स कॉलरचे नाव आहे.

अश्विन हा मूळचा नागपूर जिल्ह्यातील हिंगनरोड येथे राहणारा आहे. मुंबई पोलिसांच्या दक्षिण नियंत्रण कक्ष या ठिकाणी २५ फेब्रुवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून बंदरगाह येथे ९० किलो आरडीएक्स उतरले असून या स्फोटकाच्या साह्याने मुंबईतील सर जे.जे हॉस्पिटल, नळबाजार, भेंडीबाजार इत्यादी ठिकाणी स्फोट घडवून आणणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

पोलिसांनी तात्काळ बंदरगाह परिसरात तपासणी सुरू करून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, दरम्यान या प्रकरणी सर. जेजे मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जे जे मार्ग पोलीस पथकाने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता सदर व्यक्ती डहाणू रेल्वे स्थानक येथे असल्याची माहिती मिळाली. डहाणू पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी अश्विन मशीलकर याला ताब्यात घेतले. मुंबईत आणून त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याने पोलिसांना त्रास देण्यासाठी हा कॉल केल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *